शिक्षण-प्रशिक्षण

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोरच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग झेप; ‘विद्या प्रतिष्ठान’चे तालुक्यात कौतुक…


 

भोर – प्रतिनिधी

बारामती येथे सोमवार (दि.२१) रोजी पार पडलेल्या ‘सायबर स्पार्क २०२६’ या प्रतिष्ठित आंतरसंस्थात्मक संगणक स्पर्धेत भोरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या तंत्रज्ञानाच्या कौशल्याची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मीडियम स्कूल (भोलावडे, ता. भोर) येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

डॉ. सायरस पुनावाला स्कूल, बारामती येथे या भव्य तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील अनेक नामांकित संस्थांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या वातावरणात भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यां नी विविध उपक्रमांत यश मिळवले त्यामध्ये प्रामुख्याने पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धेत विद्यालयाच्या अरीबा इम्रान अत्तार आणि आराध्या प्रविण धोत्रे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांक पटकावला. एचटीएमएल वेबपेज डीझायीनिंग स्पर्धेत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत अनुष्का सचिन घोणे हिने आपल्या कल्पक डिझायनिंगच्या जोरावर तृतीय क्रमांक मिळविला. तर स्क्रॅच प्रोग्रामिंग स्पर्धेत विद्यालयाचे होतकरू विद्यार्थी शिवेंद्र सुरज महाडीक आणि शिवम चित्तरंजन रांगोळे यांनी या कठीण स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कोडिंग कौशल्याचे प्रदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे आणि संगणक शिक्षिका फिरदोस अत्तार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि योग्य दिशा मिळाल्यामुळेच विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभाग घेऊन यश खेचून आणले, असे मत पालकांनी व्यक्त केले.

डिजिटल युगात भोरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

​ विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उद्योजक यशवंत डाळ, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, सरपंच प्रशांत पडवळ आणि माजी गुप्तचर विभाग अधिकारी जमीर आतार यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

“आजच्या आधुनिक युगात संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. भोरच्या विद्यार्थ्यांनी बारामतीसारख्या ठिकाणी जाऊन मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळेल.”

प्रवीण जगदाळे – जिल्हा परिषद सदस्य


DEMOCRACY BULLETIN

संपादक : रूपेश रामचंद्र जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *